मराठी चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्तीला उजाळा; नॅशनल गॅलरीत दुर्मिळ छायाचित्रे, आठवणींचा खजिना; ३१ जुलैपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

भारतातील सर्वात जुन्या चित्रपटसृष्टींपैकी एक असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीचा १०० हून अधिक वर्षांचा प्रवास उलगडणारे एक प्रदर्शन फोर्ट येथील 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट' (एनजीएमए) येथे सुरू आहे. हे प्रदर्शन 'एनजीएमए'च्या 'डोम गॅलरी'मध्ये ३१ जुलैपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्तीला उजाळा; नॅशनल गॅलरीत दुर्मिळ छायाचित्रे, आठवणींचा खजिना; ३१ जुलैपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले
मराठी चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्तीला उजाळा; नॅशनल गॅलरीत दुर्मिळ छायाचित्रे, आठवणींचा खजिना; ३१ जुलैपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले
Published on

मनोज रामकृष्णन/मुंबई

भारतातील सर्वात जुन्या चित्रपटसृष्टींपैकी एक असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीचा १०० हून अधिक वर्षांचा प्रवास उलगडणारे एक प्रदर्शन फोर्ट येथील 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट' (एनजीएमए) येथे सुरू आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना मराठी चित्रपटांचा इतिहास, दिग्गज व्यक्तिमत्त्वे आणि या चित्रपटसृष्टीची दृश्यसंस्कृती अगदी जवळून अनुभवण्याची दुर्मिळ संधी मिळत आहे. हे प्रदर्शन 'एनजीएमए'च्या 'डोम गॅलरी'मध्ये ३१ जुलैपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

एनजीएमए गॅलरीत 'मराठी चित्रपट : स्टोरीज अँड स्टारडम' या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री नेहा पेंडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी 'एनजीएमए' मुंबईच्या संचालिका निधी चौधरी, कलाकार ब्रिंदा मिलर, 'कामत फोटो फ्लॅश'च्या क्युरेटर व संग्राहक नेहा कामत, चित्रपट अभ्यासक आणि संग्राहक एस. एम. एम. औसजा तसेच छायाचित्रकार शिरीष कराळे, मंगेश पवार आणि साहील सचदेवा आदी मान्यवर उपस्थित होते. निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि नेहा कामत यांनी क्युरेट केलेल्या या प्रदर्शनात दुर्मिळ संग्रहित छायाचित्रे, चित्रपटांच्या शूटिंगचे स्टिल्स, प्रसिद्धीसाठी काढलेली छायाचित्रे आणि स्टुडिओ पोर्ट्रेट्सचा मोठा संग्रह समाविष्ट आहे. हा संग्रह महाराष्ट्रातील अत्यंत लाडक्या सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांचा आणि चित्रपटातील मार्गदर्शकांचा प्रवास रसिकांसमोर मांडतो. दरम्यान, हे सर्व कालच घडल्यासारखे वाटते असे अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले तर आपल्या आधीच्या पिढीतील कलाकारांचा प्रवास, त्यांचे योगदान आणि त्यांनी मागे ठेवलेला वारसा येथे पाहायला मिळतो. चित्रपटप्रेमींसाठी प्रत्येक दशकाचा इतिहास जाणून घेण्याची ही एक उत्तम शिकण्याची संधी आहे, असे अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणाली.

दिग्गजांची पोर्ट्रेट्स

प्रदर्शनात अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांची पोर्ट्रेट्स आणि दुर्मिळ छायाचित्रे आहेत. यामध्ये पु. ल. देशपांडे, राजा गोसावी, दादा कोंडके, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, जयश्री गडकर, सुलोचना लाटकर, आशा काळे, सोनाली कुलकर्णी यांचा समावेश आहे.

व्यक्तिगत संग्रहातील छायाचित्रांचाही समावेश

दिवंगत गौतम राजाध्यक्ष, प्रदीप चंद्रा, सुधाकर ओलवे, शिरीष कराळे, मंगेश पवार आणि साहील सचदेवा यांसारख्या नामवंत छायाचित्रकारांच्या कलाकृतींसह कामत, औसजा यांच्या संग्रहातील दुर्मिळ योगदानाचाही यात समावेश आहे. हा संपूर्ण संग्रह बदलत्या चित्रपट शैली, कलाकारांची बदलती रूपे आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहिलेली मराठी चित्रपटांची जादू दृश्य स्वरूपात सादर करतो.

logo
marathi.freepressjournal.in