करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत सेलिब्रिटींना कोरोनाची लागण

करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत सेलिब्रिटींना कोरोनाची लागण

कोरोनाच्या चौथ्या लाटेने मुंबईत धडक दिली आहे. तिसऱ्या लाटेप्रमाणे याहीवेळी कोरोनाने बॉलिवूडला विळखा घातला असून, अभिनेता शाहरूख खान, कतरिना कैफ, कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चित्रपट निर्माता करण जोहरने वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत शाहरूखसह ५० ते ५५ सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे; मात्र त्याला मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोनाची सुपर स्प्रेडर ठरली आहे.

करण जोहरने ५० व्या वाढदिवसानिमित्त २५ मे रोजी यशराज स्टुडिओत पार्टी दिली होती. या पार्टीला ऋतिक रोशन, कतरिना कैफ, करिना कपूर, सैफ अली खान, सलमान खान, शाहरूख खान, आदित्य रॉय, कार्तिक आर्यन यांच्यासह ५० ते ५५ सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीत मोठ्या संख्येने सेलेब्रिटी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहरूख खानसह कैटरिना कैफ १ तारखेला, तर कार्तिक आर्यन ४ जून रोजी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आदित्य रॉय, शाहरूख खान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते.

कोरोनाची चौथी लाट मुंबईत धडकली असून गर्दी करू नये, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. तरीही करण जोहरच्या पार्टीत सेलिब्रिटींनी गर्दी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, करण जोहर यांच्या अडचणी वाढू नयेत, यासाठी अनेकांनी पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्याचे टाळले आहे. गेल्या वर्षीदेखील करण जोहरच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in