शाळांमध्ये ‘सेलिब्रेटी स्कूल’ उपक्रम; दीपक केसरकर यांची माहिती : आनंदी शनिवारचीही संकल्पना

शनिवारी अभ्यासाला सुट्टी देत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी जोपासता येणार
शाळांमध्ये ‘सेलिब्रेटी स्कूल’ उपक्रम; दीपक केसरकर यांची माहिती : आनंदी शनिवारचीही संकल्पना

प्रतिनिधी/मुंबई :शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता 'सेलिब्रेटी स्कूल' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध १८ कलागुणांशी संबंधित मान्यवरांकडून ऑनलाईन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण हलका करण्यासाठी शाळांमध्ये आनंदी शनिवार ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. शनिवारी अभ्यासाला सुट्टी देत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी जोपासता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गायन, नृत्य, अभिनय, छायाचित्रण, फिटनेस, संभाषण कौशल्य, चित्रपट दिग्दर्शन, पाककला आदी १८ कलागुणांचा समावेश असलेल्या या उपक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, शान, नवाजुद्दीन सिद्दीकी, मेरी कोम, मधुर भांडारकर, विकास खन्ना, गणेश आचार्य हे मान्यवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन कलागुणांचे धडे देतील. राज्यातील ६५ हजार शाळांमधील ४९ लाख विद्यार्थी यात सहभागी होतील. ऑनलाईन, व्हिडीओ प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्या स्पर्धकांना सेलिब्रेटींची भेट घडवून आणली जाईल.

शाळांमध्ये आनंदी शनिवार

आठवड्यातून सलग सहा दिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताण हलका करण्यासाठी आनंदी शनिवार ही संकल्पना शाळांमध्ये राबविण्यता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शनिवारच्या दिवशी अर्धा-एक तास त्यांच्या आवडीचे वाचन, गायन, नृत्य, संगीत, कृषी, स्काऊटगाइड यात सहभागी होता येईल, असेही केसरकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवावेत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय सर्व माध्यमाच्या आणि सर्व मंडळाच्या शाळांना लागू असेल. ज्या शाळा हा निर्णय मान्य करणार नाहीत, त्या शाळांचे परवाने नूतनीकरण करून दिले जाणार नाहीत, असा इशारा केसरकर यांनी दिला. राज्याचे मराठी भाषण धोरण येत्या आठवड्याभरात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in