केंद्राकडून शेतकऱ्यांची चेष्टा!धरसोड धोरण, कांदा निर्यातबंदीवरून शरद पवार आक्रमक

देशात कांद्याचे दर वाढत असल्याचे कारण पुढे करीत केंद्र सरकारने पुन्हा एकदा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला.
केंद्राकडून शेतकऱ्यांची चेष्टा!धरसोड धोरण, कांदा निर्यातबंदीवरून शरद पवार आक्रमक

मुंबई :कांदा उत्पादक शेतकरी काबाडकष्ट करून कांदा पिकवितात. मात्र, केंद्र सरकार ऐनवेळी कांदा निर्यातीवर बंदी आणून शेतकऱ्यांना धक्का देत आहे. त्याचीच प्रचिती आता आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. केंद्र सरकार सातत्याने निर्यातबंदी करीत असल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आक्रमक झाले असून, सोमवारी त्यांनी थेट नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे जाऊन शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धरसोडवृत्तीवर हल्लाबोल केला. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत नाही आणि जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही, तोपर्यंत केंद्राला कळत नाही, असे पवार म्हणाले.

देशात कांद्याचे दर वाढत असल्याचे कारण पुढे करीत केंद्र सरकारने पुन्हा एकदा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, नाशिक जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या निर्णयावरून शरद पवार यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आज नाशिक जिल्ह्याचा दौरा करीत थेट चांदवड येथील शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

यावेळी झालेल्या सभेदरम्यान पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कांदा निर्यातबंदी करून केंद्र सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा कष्टाला किंमत मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यातबंदी उठलीच पाहिजे, असे पवार म्हणाले. आम्हाला काही रस्त्यावर उतरण्याची हौस नाही. परंतु रस्त्यावर उतरल्याशिवाय दिल्लीला कळतच नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी यूपीए सरकारच्या काळात जेव्हा कांदा निर्यातबंदीचा मुद्दा पुढे आला, तेव्हा तत्काळ दिल्लीत जाऊन मी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

धोरणकर्त्यांना जाण नसेल

तर शेतकरी उद्ध्वस्त

केंद्र सरकार सातत्याने शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुळात ज्यांना धोरण ठरविण्याचा अधिकार आहे, त्यांना त्यासंबंधीची जाण नसेल, तर देशातील शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.

पवारांच्या काळात

दोनवेळा निर्यातबंदी

कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांसोबत रास्ता रोको केला आणि त्यानंतर कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना दोनवेळा कांदा निर्यातबंदी केल्याची आठवण करून दिली. अशावेळी विदेशातील किंमत नव्हे, तर देशातील जनतेचे हित बघायचे असते. मात्र, यात शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये, हे सरकारने पाहिले पाहिजे. ते आम्ही करीत आहोत, असेही ते म्हणाले.

...तर केंद्र सरकार कांद्याची खरेदी करेल

कोणत्याही परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण होऊ देणार नाही. शेतकऱ्यांची अडचण झालीच तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

logo
marathi.freepressjournal.in