
मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणे, पाणी संरक्षण व कचरा व्यवस्थापनासाठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ६२० कोटी तर पाणी संरक्षण व व्यवस्थापनासाठी ९९० कोटी रुपये असा एकूण १,६१० कोटी रुपयांचा निधी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मुंबई पालिकेला उपलब्ध करून दिला आहे. यात रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी फोडणे आदींसाठी हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
मुंबईतील हवेचा स्तर खालावला असून यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे दमा, श्वसनाच्या विकारात वाढ झाली आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असून बांधकाम ठिकाणी ३५ फूट उंच भिंत बांधणे सीसीटीव्ही बसवणे धुळीचे कण पसरू नये यासाठी पडदे लावणे पाण्याची फवारणी करणे, स्प्रीकलर बसवणे अशा २७ प्रकारची नियमावली गेल्या वर्षी जारी केली. नियमावली जारी केल्यानंतर ही नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन करणाऱ्या बांधकामांना स्टाॅप वर्क नोटीस बजावण्यात आली होती. एकूणच मुंबईतील हवेचा स्तर उंचावण्यासाठी मुंबई महापालिका अँक्शन प्लॅन तयार केला असून त्या अंतर्गत अंमलबजावणी केली जात आहे.
राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार व पाठविलेल्या नमुन्याप्रमाणे, मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेने हवेचा कृती आराखडा तयार केला आहे. कृती आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण करणे, अडथळे दूर करुन वाहतूक कोंडी कमी करणे, वाहतूक शिस्तबद्ध करणे, अत्याधुनिक वाहतूक प्रणाली विकसित करणे, वांद्रे कुर्ला संकुल, लोअर परळ इत्यादी विभागातील वाहनांद्वारे उत्सर्जित होणारे हवा प्रदूषण कमी करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे या संबंधातील उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत पालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ६२० कोटी (अंदाजे) अनुदान दिले आहे. तर पाणी संरक्षण व कचरा व्यवस्थापनासाठी ९९० कोटी रुपयांचा निधी पालिकेला उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
या उपाययोजनांची अंमलबजावणी
पाणी शिंपडण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी
वाहतुकीसाठी ई - बस खरेदी करणे
बॅटरी चार्जिंग स्टेशन सुरू करणे
हरित पट्ट्याची वाढ व सुधारणा करणे
कचऱ्याचे उर्जेत रुपांतरण करणे