मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बरमार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढणार!

५६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत असून यापूर्वी बदलापूर, कळवावासियांच्या विरोधामुळे दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या
मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बरमार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढणार!

येत्या काही दिवसात नेरुळ - खारकोपर - उरण मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मार्ग सुरू होताच प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मार्गावर आणखी फेऱ्या उपलब्ध होणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला सीएसएमटी - कसारा, खोपोली या मुख्य मार्गावर तसेच हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर सामान्य लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याबाबत अद्याप विचार सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

१८ फेब्रुवारी रोजी एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका आणि जलद लोकलचे वेळापत्रक सुधारण्यासाठी ठाणे - दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या - सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर लोकलच्या ३६ नवीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यात ३४ वातानुकूलित आणि दोन विनावातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. सध्या दररोज ५६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत असून यापूर्वी बदलापूर, कळवावासियांच्या विरोधामुळे दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फेऱ्या पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही; मात्र फेब्रुवारी २०२३ पासून मध्य रेल्वेवर नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यावेळी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा विचार सुरू असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, ठाणे-दिवा पाचवी, सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर सामान्य लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in