
मुंबई: मध्य रेल्वेने कर्जत स्थानकात प्री नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले असून यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आले आहेत. गुरुवारी दसऱ्याच्या दिवशीही या कामासाठी ब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांना कर्जत, खोपोली मार्गावर प्रवास करताना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात आले आहेत. या कामासाठी बुधवार आणि गुरुवारीही ब्लॉक घेण्यात आला असल्याने अनेक लोकल सेवेवर परिणाम होणार आहे.
ब्लॉक कालावधीत २ ऑक्टोबर रोजी अनेक डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुपारी १.१५ वाजता सुटणारी कर्जत ते खोपोली लोकल रद्द करण्यात येईल. तर अप मार्गावर दुपारी २.५५ वाजता सुटणारी खोपोली ते कर्जत लोकल रद्द करण्यात येईल. काही लोकल अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये सकाळी ९.०१, ९.३०, ९.५७, ११.१४ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी ते कर्जत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील. नेरळ ते कर्जत लोकल सेवा रद्द असेल. तर दुपारी १२.०५ वाजता ठाणे ते कर्जत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येईल. नेरळ ते कर्जत लोकल सेवा रद्द असेल.