

मुंबई : शीव उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने बुधवार १७ जूनपासून विशेष ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक १७ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू होऊन २५ जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत कुर्ला ते सीएसएमटीदरम्यान लोकल सेवा काही कालावधीत बंद राहतील.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी मध्यरात्री १.१० ते ३.१०, १८ जून रोजी १२.४५ ते ३.४५, १९ व २० जून रोजी १.१० ते २.४०, तर २१ ते २४ जूनदरम्यान दररोज १.१० ते ३.१० वाजेपर्यंत माटुंगा-कुर्ला दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार असून १७ जून रोजी रात्री १२.२४ वाजता सुटणारी सीएसएमटी ते ठाणे लोकल तसेच पहाटे ४.०४ वाजताची ठाणे ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे.
१८ जून रोजी बदलापूर-परळ (रात्री १०.४०), खोपोली-परळ (रात्री १०.१५) आणि बदलापूर-सीएसएमटी (रात्री ११.२९) या लोकल सेवा कुर्ला येथेच समाप्त करण्यात येणार आहेत. तर रात्री ११.४० वाजताची ठाणे-कुर्ला लोकल सीएसएमटीपर्यंत चालवण्यात येणार आहे.