मुंबई : थर्टी फर्स्टचा फिवर चढत असून मुंबईकर व पर्यटकांच्या सेवेत मध्य रेल्वेने धाव घेतली आहे. ३१ डिसेंबरला मध्यरात्री १.३० ते सोमवारी पहाटेपर्यंत चार विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नवीन वर्षांसाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा या पर्यटन स्थळी थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुंबईकरच नव्हे, तर पुणे, रायगड आदी भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने विशेष चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ४ विशेष उपनगरीय सेवा चालवणार असून रविवार ३१ डिसेंबर सोमवार १ जानेवारी २०२४ रोजी पहाटेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत चालवण्यात येणार आहेत.
मेन लाईन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष ट्रेन रविवारी १.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे सोमवारी पहाटे ३ वाजता पोहोचेल. तर कल्याण स्थानकातून रविवारी रात्री १.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी स्थानकात ३ वाजता पोहोचेल.
हार्बर मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.३० वाजता सुटेल आणि सोमवारी रात्री २.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल. तर पनवेल स्थानकातून रविवारी रात्री १.३० वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी स्थानकात २.५० वाजता पोहोचेल.