Mumbai : मालवाहतुकीत ११ टक्क्यांची वाढ; ४,८०९ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत मालवाहतुकीतून ४,८०९.१८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. या काळात रेल्वेने १८ हजार ३३७ रेकच्या माध्यमातून ४८.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली.
मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ११ टक्क्यांची वाढ झाली असून, ४,८०९.१८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. (संग्रहित छायाचित्र)
मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ११ टक्क्यांची वाढ झाली असून, ४,८०९.१८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. (संग्रहित छायाचित्र)
Published on: 

मुंबई : मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत मालवाहतुकीतून ४,८०९.१८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. या काळात रेल्वेने १८ हजार ३३७ रेकच्या माध्यमातून ४८.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. मागील वर्षीच्या याच कालावधीतील ४३.५४ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत यंदा सुमारे ११ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच महसुलातही सहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

मागील वर्षी एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान १७ हजार १२८ रेकच्या माध्यमातून मालवाहतूक करण्यात आली होती. यंदा रेकच्या संख्येत १,२०९ ने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत मालवाहतुकीतून ४,५१७.९१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा ते वाढून ४,८०९.१८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

विभागनिहाय कामगिरीत नागपूर विभागाने आघाडी कायम राखली आहे. एकूण मालवाहतुकीपैकी २८.५३ दशलक्ष टन मालाची वाहतूक नागपूर विभागातून झाली. त्याचा एकूण मालवाहतुकीतील वाटा ५९ टक्क्यांहून अधिक आहे. तर मुंबई विभागाने ११.८५ दशलक्ष टन मालवाहतूक करत २४ टक्क्यांहून अधिक योगदान दिले. महसुलाच्या बाबतीतही नागपूर विभाग अव्वल ठरला. या विभागाने २,८६७.५४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले, तर मुंबई विभागातून १,१२३.५७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

वस्तूनिहाय मालवाहतुकीत कोळशाचा सर्वाधिक वाटा राहिला. सात महिन्यांत ६,०२३ रेकद्वारे २३.८१ दशलक्ष टन कोळशाची वाहतूक करण्यात आली. एकूण मालवाहतुकीतील त्याचे प्रमाण ४९.२६ टक्के असून, यातून २,१८१.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर कंटेनर वाहतुकीतून ५.९५ दशलक्ष टन, तर पेट्रोलियम उत्पादनांतून ४.०७ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली. सिमेंट, लोखंड-पोलाद, खते आणि लोहखनिजाच्या वाहतुकीतूनही रेल्वेला मोठा महसूल मिळाला.

दरम्यान, ऑटोमोबाईल वाहतुकीतही वाढ झाली असून, एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ६५२ रेकद्वारे वाहनांची वाहतूक करण्यात आली. मागील वर्षी याच काळात ५५८ रेकची नोंद होती. त्यामुळे यंदा ९४ रेकची वाढ झाली आहे.

बांगलादेशला पहिली मालगाडी रवाना

मालवाहतुकीच्या क्षेत्रात मध्य रेल्वेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. येवला गुड्स शेडमधून बांगलादेशसाठी निर्यात मालाची बुकिंग करण्यात आली. पुणे विभागातून सुरू झालेली ही पहिली आंतरराष्ट्रीय मालवाहतूक ठरली आहे. २३ ऑक्टोबर रोजी २,७१४ टन मळी घेऊन ५० बीटीपीएन वॅगन्सची मालगाडी बांगलादेशातील बेनापोल येथे रवाना झाली. या वाहतुकीतून रेल्वेला १.११ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मालवाहतुकीचा वेग कायम

ऑक्टोबर २०२६ मध्ये मध्य रेल्वेने २,६८६ रेकद्वारे ७.२४ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये २,५०३ रेकद्वारे ६.१७ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली होती. यंदा मालवाहतुकीच्या प्रमाणात १७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या महिन्यात रेल्वेला ६९२.१२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या ६४३.५६ कोटी रुपयांच्या तुलनेत महसुलात सात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्येही नागपूर विभागाने ४.२६ दशलक्ष टन मालवाहतूक आणि ४०५.२७ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह आघाडी घेतली. मुंबई विभागाने १.७१ दशलक्ष टन मालवाहतूक करून १६०.२३ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. या महिन्यात कोळशाच्या वाहतुकीसाठी ८९६ रेक वापरण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत २६० रेकची वाढ झाली. पेट्रोलियम उत्पादनांसाठी २३६, तर क्लिंकरच्या वाहतुकीसाठी ८५ रेकची नोंद झाली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)