
मधल्या काळात बंद असलेली प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा मध्य रेल्वेने मागील तीन महिन्यांपासून पुन्हा सुरू केली. मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना स्थानकात सोडण्यासाठी येणाऱ्यांना प्लॅटफॉर्म तिकीट मिळत नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मध्य रेल्वेने काही गर्दीच्या स्थानकांत हे तिकीट देण्याचा निर्णय घेतला. मात्र वाढती प्रवाशांची गर्दी आणि विनाकारण रेल्वेमधील अलार्म चेन पुलिंगचा होत असलेला गैरवापर रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून पुन्हा ५० रुपये इतके केले आहेत.
सणासुदीच्या काळात वाढणारी गर्दी आणि गैरसोय पाहता प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यापासून सेवेत आणली. याआधीही हे तिकिट देण्यात येत होते. मात्र कोरोनाकाळात ही सुविधा बंद करण्यात आली होती. परंतु मागील तीन महिन्यांपासून ही सुविधा सुरु झाल्यापासून स्थानकातील येणाऱ्या प्रवाशांची तसेच त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे अवघड होत असून अपघाताच्या, चोरीच्या घटना घडत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये रेल्वेतील अलार्म चेन विनाकारण खेचत वाहतूक विस्कळीत करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे अशा घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत ५० रुपये पर्यंत तात्पुरते वाढवण्याचा निर्णय घेतला असून ९ ते २३ मे पर्यंत १५ दिवसांसाठी गर्दीच्या सीएसएमटी, दादर, टिळकनगर, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर हे अंमलात आणले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वने दिली आहे.