लोकल प्रवास आणखी सुरक्षित मध्य रेल्वेने बसवली एएडब्ल्यूएस यंत्रणा

लोकल प्रवास आणखी सुरक्षित मध्य रेल्वेने बसवली एएडब्ल्यूएस यंत्रणा

ब्रेक दाबल्यावर ही ट्रेन २९० मीटर जाऊ शकते

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व कार्यक्षम होण्यासाठी ॲॅडव्हान्स ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टीम (एएडब्ल्यूएस) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये बसवण्यात आली आहे.

यापूर्वी रेल्वेत ‘ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टीम (एडब्ल्यूएस) ही यंत्रणा होती. या यंत्रणेत एक यंत्र मोटारमनच्या कॅबिनमध्ये, तर दुसरे रेल्वे मार्गात ठेवले होते. ट्रेनच्या वेगावर लक्ष ठेवून चुकीने सिग्नल ओलांडला गेल्यास तत्काळ ब्रेक लागत होते,

तर एएडब्ल्यूएस यंत्रणेत सुरक्षा यंत्रणा अधिक वरिष्ठ पातळीवर नेली आहे. ट्रेनवर देखरेख व स्वयंचलित सिग्नल यंत्रणेद्वारे ट्रेनला नियंत्रित करणे आदी कामे होणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली.

एएडब्ल्यूएस प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत दक्षता ठेवते, आवश्यक असल्यास मोटरमनला सतर्क करते. जेव्हा लाल सिग्नल असेल तेव्हा ‘एएडब्लूएस’ यंत्रणा मोटरमनला सतर्क करतानाच आपोआप स्वयंचलित ब्रेक दाबते. तसेच ट्रेनचा वेग वाढल्यास आपोआप आपत्कालीन ब्रेक लागतात. वेग कमी झाल्यावर आपोआप स्वयंचलित ब्रेक सोडले जातात.

सिग्नल ओलांडणे धोकादायक असते. तो रोखण्यासाठी ‘सिग्नल पास ॲॅट डेंजर’ (एसपीएडी) हे मोटरमनच्या डेस्कवर बसवले आहे. ‘एएडब्ल्यूएस’ यंत्रणेमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा अधिक चांगल्या बनल्या आहेत. सिग्नल यंत्रणेत बदल केल्याने प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा आनंद मिळू शकतो.

अशी काम करेल यंत्रणा

एएडब्ल्यूएस यंत्रणेत दोन महत्त्वाचे भाग आहेत. त्यातील एक यंत्रणा रेल्वे मार्गात व दुसरी मोटरमनच्या कॅबिनमध्ये बसवली जाईल. सिग्नल रंगावरून ट्रेनचा वेग निश्चित केला जाईल. हिरवा किंवा डबल पिवळा सिग्नल असल्यास हार्बर मार्गावर लोकलचा वेग ८० किमी प्रतितास व मुख्य मार्गावर १०५ किमी असेल. जेव्हा लोकल ट्रेन वेगमर्यादा ओलांडेल, तेव्हा ही यंत्रणा मोटरमनला सतर्क करेल. मात्र, मोटरमनकडून चार सेकंदांत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास स्वयंचलित ब्रेक तत्काळ लागतील. ही लोकल ट्रेन १०० मीटरपर्यंत जाईल. पिवळा सिग्नल आढळल्यास वेगमर्यादा ७७.५ किमी/ताशी सेट केली आहे. यामुळे ब्रेक दाबल्यावर ही ट्रेन २९० मीटर जाऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in