मध्य रेल्वेचा 'खेळखंडोबा सुरूच', लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना लेटमार्क

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात लावलेल्या नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील तांत्रिक बाबींमुळे मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांना मोठा फटका बसत आहे.
मध्य रेल्वेचा 'खेळखंडोबा सुरूच', लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना लेटमार्क

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात लावलेल्या नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील तांत्रिक बाबींमुळे मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांना मोठा फटका बसत आहे. लोकल दररोज विलंबाने धावत असतानाच एक्स्प्रेस गाड्यांनाही लेटमार्क लागत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. गाड्या रखडण्याचा तिढा कधी सुटणार यावर रेल्वे प्रशासनाकडे उत्तर नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणासाठी रेल्वेने गेल्या आठवड्यात मेगाब्लॉक घेतला. या ब्लॉकनंतर लोकल सुरळीत धावतील, अशी आशा मुंबईकरांना होती. मात्र, त्या आशेवर पाणी फेरले आहे. सीएसएमटी स्थानकात लावलेली नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील तांत्रिक त्रुटींमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. त्याचा फटका सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना बसत आहे.

मंगळवारी मुख्य मार्गावर लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच प्रवाशांना पूर्वसूचना न देताच धिमी लोकल जलद करण्यात आली. यामुळे इच्छित स्थानकांवर उतरता न आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, तर काही कमी अंतराच्या लोकल रद्द करण्यात आल्या. वेळापत्रक बिघडल्याने लोकलचा वेग मंदावला होता. त्यामुळे लोकलच्या एकामागोमाग एक रांगा लागल्या होत्या. सायंकाळी लोकल विलंबाने धावत असल्याने सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला अशा प्रमुख स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती, तर लांब पल्ल्याच्या गाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. १० जून रोजी दादरवरून सुटणारी तुतारी एक्स्प्रेस एक तास उशिराने धावत होती, तर ११ जून रोजी कोकणात जाणारी तेजस एक्स्प्रेस ५० मिनिटे उशिराने धावत होती.

सुरक्षित अंतरामुळे खोळंबा

एक्स्प्रेस आणि लोकलमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे. यामुळे गाड्यांचा मोठा खोळंबा होत असून, लोकल सेवा उशिराने धावत आहेत, तर नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे मेल-एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

शुक्रवारपर्यंत लोकल वेळेत धावणार?

नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील तांत्रिक बाबींमुळे लोकल विलंबाने धावत आहेत. याबाबत विचारले असता मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला म्हणाले की, लोकल, एक्स्प्रेस काही मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू असून येत्या शुक्रवारपर्यंत लोकल वेळेत धावतील.

logo
marathi.freepressjournal.in