मध्य रेल्वेचा प्रवास सुरक्षित :३० ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद; आगीच्या घटना टाळण्यासाठी ४२० स्मोक डिटेक्टर

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
मध्य रेल्वेचा प्रवास सुरक्षित :३० ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद; आगीच्या घटना टाळण्यासाठी ४२० स्मोक डिटेक्टर
PM

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय हद्दीतील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वेने ३० ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद केले, तर आगीच्या घटना टाळण्यासाठी विविध डब्यांमध्ये ४२० स्मोक डिटेक्टर बसवण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर लेव्हल क्रॉसिंग करताना होणारे अपघात टाळण्यासाठी लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मध्य रेल्वेवर रोड ओव्हरब्रीज किंवा रोड अंडरब्रीज बांधून लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद केले जात आहेत. लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद केल्याने वेळेत नियमितता राखण्यात मदत होते आणि सुरक्षितता वाढते.  मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर एकूण ३० लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करण्यात आले असून त्यात भुसावळ विभागातील १०, नागपूर विभागातील ८, पुणे विभागातील ६, मुंबई विभागातील ५ आणि सोलापूर विभागातील १ असा समावेश आहे.

आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे डब्बे आणि शक्तीयान मध्ये धूर शोधक व धूर  शामक यंत्रणा बसवण्यात येत आहे.  एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३  विविध डब्यांमध्ये एकूण ४२० धूर शोधक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत.

ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर सिस्टम!

ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर प्रणाली एका विभागात दुसऱ्या ट्रेनला परवानगी देण्यापूर्वी रेल्वे रूळ रिकामा असल्याची खात्री करते. यंत्रणेतील सेन्सर्स इंजिन चालक आणि गार्डच्या दोन्ही बाजूहून जाणाऱ्या एक्सलची संख्या तपासतात. जर संख्या जुळत नसेल तर ते त्रुटी किंवा अनियमितता दर्शवते. त्यामुळे मानवी चुका दूर होतात आणि स्थानकांदरम्यान गाड्यांचे सुरक्षित परिचालन नियंत्रित होते. एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर एकूण २३ ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर प्रदान करण्यात आले आहेत, ज्यात मुंबई विभागातील २, भुसावळ विभागातील २, नागपूर विभागातील ६, पुणे विभागातील ४ आणि सोलापूर विभागातील ९ यांचा समावेश आहे.

सुरक्षितता चाचण्या

नोव्‍हेंबर-२०२३ या महिन्यात ७ सुरक्षितता चाचण्‍या पार पडल्या. ज्यामध्ये पुणे विभागातील ४ आणि भुसावळ, नागपूर व सोलापूर विभागातील प्रत्येकी १ चा समावेश आहे. एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत आतापर्यंत एकूण ८२ सुरक्षा सचोटी चाचण्या घेण्यात आल्या, ज्यात नागपूर विभागातील २३, सोलापूर विभागातील १७, पुणे विभागातील १० आणि मुंबई आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी १६ चाचण्यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in