

मुंबई : तिकिटांचा गैरवापर, सवलतीच्या तिकिटांमधील अनियमितता आणि आरक्षण कोट्याचा गैरवापर रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रवाशांच्या तिकिटांची वैधता तपासण्याबरोबरच सवलतीची तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा तसेच विविध पासच्या आधारे होणाऱ्या प्रवासावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
एकाच पीएनआरवर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास त्यापैकी किमान एका प्रवाशाकडे रेल्वेच्या नोंदीत नमूद केलेले विहित मूळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. आवश्यक ओळखपत्र सादर करता न आल्यास, लागू नियमांनुसार त्या पीएनआरवरील सर्व प्रवाशांना वैध तिकिटाशिवाय प्रवास करणारे मानले जाऊ शकते आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
मूळ कागदपत्रेही तपासली जाणार
सवलतीच्या दरातील किंवा विशिष्ट आरक्षण कोट्याअंतर्गत तिकीट काढलेल्या प्रवाशांची पात्रता सिद्ध करणारी मूळ कागदपत्रेही तपासली जाणार आहेत. तसेच ई-पास किंवा पीटीओच्या आधारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विहित मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रवासापूर्वी ई-पास किंवा पीटीओच्या बदल्यात अधिकृत तिकीट अथवा पास प्राप्त केला आहे, याचीही खात्री करावी लागणार आहे. यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
‘टीटीई ॲप’च्या माध्यमातून पडताळणी
विशेषतः अनारक्षित तिकिटांची सत्यता तपासण्यासाठी आवश्यकतेनुसार तिकीट तपासणी कर्मचारी ‘टीटीई ॲप’च्या माध्यमातून तिकिटांचे प्रमाणीकरण आणि पडताळणी करणार आहेत. आरक्षण सुविधांचा गैरवापर, सवलतींचा गैरफायदा आणि पासचा फसव्या पद्धतीने वापर रोखून रेल्वेच्या महसुलातील गळती थांबवणे हा मोहिमेचा उद्देश आहे.
प्रवाशांनी सहकार्य करावे
मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट, लागू असल्यास विहित मूळ ओळखपत्र आणि पात्रता सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच तिकीट तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.