
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे रविवारी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे स्पष्ट करत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद उपनगरी सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर लाइन
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाइन वगळून) अप आणि डाऊन हार्बर लाइनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून १०.३३ ते दुपारी ४.४९ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर लाइन सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९.४५ ते दुपारी ४.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाइन सेवा रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर लाइन
पनवेल येथून ११.०२ ते दुपारी ४.५३ पर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाइन सेवा आणि ठाणे येथून १०.०१ ते दुपारी ४.२० पर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर लाइन सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्टेशन दरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध राहतील. ब्लॉक कालावधीत पोर्ट लाइन सेवा उपलब्ध असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.