

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे रविवारी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार आणि ठाणे दरम्यानच्या ५ व्या व ६ व्या मार्गावर आणि ठाणे व वाशी व नेरुळ दरम्यानच्या अप व डाऊन मार्गांवर हा ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेने शनिवारी रात्री ब्लॉक घेतला असल्याने रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाही.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १.३० या वेळेत ब्लॉक असेल. या कालावधीत डाऊन मेल आणि एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवतील व ठाणे स्थानकावर पुन्हा वळवल्या जातील. यावेळी लोकल सेवा नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा धावतील तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर गोदान एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-काकिनाडा पोर्ट एक्स्प्रेसचे मार्ग परिवर्तन करण्यात येणार आहेत.
बेलापूर-उरण मार्गावरील गाड्या वेळापत्रकानुसार
सकाळी १०.३५ ते सायंकाळी १६.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून वाशी-नेरुळ-पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. सकाळी १०.२५ ते सायंकाळी १६.०९ वाजेपर्यंत पनवेल-नेरुळ-वाशी येथून ठाणे येथे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. बेलापूर-उरण मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील.
परेवर नाईट ब्लॉक
पश्चिम रेल्वेद्वारे वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान उपनगरीय मार्गावर शनिवारी मध्यरात्री ‘जंबो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत आणि डाऊन फास्ट मार्गावर रात्री १.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत जंबो ब्लॉक घेण्यात येईल. यावेळी जलद मार्गावरील गाड्या विरार व भाईंदर-बोरिवलीदरम्यान धीम्या धावतील.
ट्रान्स- हार्बर लाइनवरील सेवा बंद
ट्रान्स-हार्बर लाइनवर ठाणे आणि वाशी,नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवर सकाळी ११.१० ते सायंकाळी १६.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यावेळी ठाणे व वाशी-नेरुळ-पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाइनवरील सेवा बंद राहतील.