

मुंबई : मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, २३ ऑगस्ट रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक घेतला आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यानच्या अप-डाऊन मार्गावर आहे.
सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान सुटणाऱ्या वाशी,बेलापूर,पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर,वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान सुटणाऱ्या सीएसएमटी येथे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.