मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक; जलद मार्गावरील लोकल विस्कळीत होणार

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर शनिवारी मध्यरात्री अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होणार आहेत. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर शनिवारी मध्यरात्री अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होणार आहेत. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री १२.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होतील. ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर रविवारी दिवसा मुख्य मार्ग, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही.

ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस विद्याविहार ते ठाणे/ कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत रेल्वेगाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉकदरम्यान सहाव्या मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कल्याण/दिवा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि १० ते १५ मिनिटे उशिराने पोहचतील. गाडी क्रमांक १८०३० शालिमार ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १८५१९ विशाखपट्टणम ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २०१०४ आजमगढ ते लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस जलद मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावर लोकल धावणार नाही. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल गोरेगाव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील, तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील अंधेरी आणि बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

logo
marathi.freepressjournal.in