मध्य रेल्वेने आपत्कालीन घटनांसाठी मॉकड्रिलचे आयोजन केले

मध्य रेल्वेने आपत्कालीन घटनांसाठी मॉकड्रिलचे आयोजन केले

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दरवर्षी आपत्कालीन घटना घडू नये, अथवा घडल्यास सतर्कता बाळगण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतात. यामध्ये मॉकड्रिलला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. मंगळवार, १७ मे रोजी प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत कल्याण अप यार्ड ठिकाणी मॉकड्रिल आयोजित करण्यात आले. दुर्घटना घडल्यास विविध संबंधितांची सतर्कता आणि प्रतिसाद, वेळ याद्वारे तपासण्यात आला.

कल्याण अप यार्ड येथे सकाळी १०.३० वाजता हा सराव सुरू करण्यात आला. यावेळी गाडी क्रमांक १११३०चा एक डब्बा रुळावरून घसरला आणि गाडी क्रमांक ११०२१च्या शेजारील डब्याला धडकून दोन्ही गाड्यांना आग लागली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण करण्यात आली. यानंतर क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी मुंबई विभागाच्या आपत्कालीन नियंत्रणास त्वरित संदेश दिला. नियंत्रण कार्यालयाने तत्काळ कारवाई केली.

एनडीआरएफची टीम १०.४५ वाजता घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मोठे बचावकार्य सुरू केले. रेल्वे रुग्णवाहिका १०.४० वाजता पोहोचली आणि जखमी प्रवाशांना त्वरित वैद्यकीय मदत दिली गेली. यानंतर ११ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणली. त्यानंतर कल्याणच्या अपघात निवारण ट्रेनने ११.५५ वाजता रुळावरून घसरलेल्या कोचला पुन्हा रुळांवर आणण्याचे काम पूर्ण केले. या मॉकड्रिलद्वारे मध्य रेल्वे प्रशासनाने विविध संबंधितांची सतर्कता आणि प्रतिसाद, वेळ तपासत मध्य रेल्वेमार्गावर अपघातशून्य करण्याचे उद्दिष्ट ठरवले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in