
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर ठाणे - कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ब्लॉक आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३. ०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
या सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तर कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, या सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. नंतर मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे, विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील. हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द
दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत ब्लॉक असेल.
पश्चिम रेल्वेवर मंगळवारी ब्लॉक; रविवारसाठी दिलासा
रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या कामांसाठी मंगळवार, २० मे रोजी रात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. रात्री १२.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो मार्गांवर ०३.३० तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रविवार, १८ मे रोजी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसेल. ब्लॉक कालावधीत, विरार/वसई रोड ते बोरिवली/भाईंदर दरम्यान सर्व स्लो मार्गावरील गाड्या जलद मार्गांवर चालवल्या जातील. तसेच, ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येतील.