मध्य रेल्वे विस्कळीत; रणरणत्या उन्हात रेल्वे प्रवाशांची पदयात्रा

गेल्या अनेक महिन्यांपासून मध्य रेल्वेची सेवा विलंबाने धावत आहे. डोंबिवली स्टेशनवरून १२.४६ ची बदलापूर लोकल ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान थांबली. गाडी थांबण्याचे कारण सांगितले जात नसल्याने प्रवासी वैतागले होते.
मध्य रेल्वे विस्कळीत; रणरणत्या उन्हात रेल्वे प्रवाशांची पदयात्रा
Published on

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या गोंधळाचा फटका नेहमीच प्रवाशांना बसत आहे. आधीच रोज उशिरा धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांचे वेळापत्रक बिघडलेले असते. त्यात गुरुवारी बदलापूरला जाणारी लोकल दुपारी १२.४६ वाजता ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान पेंटाग्राफमधील बिघाडामुळे थांबली. त्यामुळे रणरणत्या उन्हातून प्रवाशांना आपले इच्छित स्टेशन गाठावे लागले. रेल्वेच्या या गोंधळात दुपारी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. आधीच उन्हाचा ताप, त्यात लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांच्या त्रासाला पारावर राहिला नव्हता. गेल्या अनेक महिन्यांपासून मध्य रेल्वेची सेवा विलंबाने धावत आहे. डोंबिवली स्टेशनवरून १२.४६ ची बदलापूर लोकल ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान थांबली. गाडी थांबण्याचे कारण सांगितले जात नसल्याने प्रवासी वैतागले होते.

कंटाळून काही प्रवाशांनी रेल्वेरुळावरून चालत रेल्वे स्थानक गाठले. रेल्वेरुळातून जात असताना एक्स्प्रेस जलदगती मार्गावरून जात होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. पेंटाग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास अर्धा तास लोकल सेवा बंद होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत झाली. जवळपास तासभर लोकल नसल्याने डोंबिवली ते कल्याणदरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली होती. या गोंधळाचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला.

logo
marathi.freepressjournal.in