क्यूआर कोडवरून समजणार एक्स्प्रेसची वेळ
मुंबई : मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक क्यूआर कोडवरून जाणून घेण्याची सेवा मध्य रेल्वेने सुरू केली आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल येथून सुटणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड कार्यान्वित केला आहे.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा तपशील जलद व सोयीस्करपणे उपलब्ध व्हावा यासाठी मध्य रेल्वेने क्यूआर कोड आधारित माहिती प्रणाली सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना साध्या स्कॅनद्वारे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकाची माहिती मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल स्थानकांवर क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. या माध्यमातून प्रवाशांना मेल/एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक, प्रवासी आरक्षण प्रणाली नियम, मार्ग नकाशा, मध्य रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ, तक्रार निवारण आणि मदतीसाठी रेलमदद पोर्टल आदी माहिती उपलब्ध होईल.