मान्सूनसाठी मध्य रेल्वे सज्ज! पावसाळ्यापूर्वीची ८० टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती

नुकतेच रेल्वेच्या महाव्यवस्थापकानी मोठ्या प्रमाणात पार पडलेल्या कामांचे कौतुक करताना पावसाळ्याशी संबंधित शिल्लक कामे उद्दिष्टाच्या तारखेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या
मान्सूनसाठी मध्य रेल्वे सज्ज! पावसाळ्यापूर्वीची ८० टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात रेल्वे वाहतूक ठप्प होत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मान्सूनपूर्व कामांमध्ये मध्य रेल्वे अग्रेसर असून मार्गावरील जवळपास ८० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. नुकतेच रेल्वेच्या महाव्यवस्थापकानी मोठ्या प्रमाणात पार पडलेल्या कामांचे कौतुक करताना पावसाळ्याशी संबंधित शिल्लक कामे उद्दिष्टाच्या तारखेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सर्व असुरक्षित ठिकाणी २४ तास देखरेख ठेवण्याची सूचनाही त्यांनी दिल्या.

पावसाळा अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आगामी पावसाळ्यात सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढणे, कल्व्हर्ट आणि नाले साफ करणे, झाडे छाटणे, खड्डे स्कॅन करणे, पाणी साचणारी असुरक्षित असलेल्या ठिकाणी उच्च वॅटेज पंपची व्यवस्था करणे, मल्टी- सेक्शन डिजिटल काउंटर इ. तयारी केली आहे. यासोबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आपल्या उपनगरीय नेटवर्कवर तसेच घाटांवर मान्सूनच्या खबरदारीच्या उपाययोजना पूर्ण केल्या आहेत.

दरम्यान, उपनगरीय विभागातील ५९ किलोमीटर नाल्यांचे गाळ काढण्यात आले असून सध्या आणखी ५९ किलोमीटर नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबत विभागांवरील ३८ कल्व्हर्ट्स स्वच्छ केले आहेत आणि सध्या आणखी ४५ कल्व्हर्ट्सच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत ७ हजार ८९३ वेगवेगळ्या ठिकाणी झाडे कापण्याचे व छाटण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. घाट विभागात ३३४ नग स्कॅनिंग आणि ड्रॉपिंगचे काम हाती घेण्यात आले असून आणखी २६० नगांचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय घाटात बोल्डर्स पडू नयेत यासाठी बोल्डर जाळी आणि बोगदा पोर्टलचे कामही हाती घेण्यात आले आहे.

पळसदरी धरणात बोटींच्या दोन चाचण्या पूर्ण

पावसाळ्यातील आव्हाने लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने सुरक्षा बोटीत वाढ करण्याचा निर्णय घेत उपनगरीय रेल्वे मार्गावरील पूर परिस्थिती अथवा इतर सागरी संकटांचा सामना करण्यासाठी तब्ब्ल ५ बोटी आपल्या ताफ्यात तैनात केल्या आहेत. सध्या कसाऱ्यातील रेल्वेच्या पळसदरी धरणामध्ये या बोटींच्या चाचण्या सुरु असून आवश्यक सर्व उपाययोजना, सुविधांची तयारी सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांनी दिली. रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथके स्थापन करत, प्रशिक्षण देत आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. रेल्वे पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा बोटींद्वारे हद्दीत गस्त घालण्यात येत आहे. दरम्यान, उपनगरीय रेल्वे मार्गावरील पूरपरिस्थिती टाळण्यासाठी सीएसएमटी, सायन, माटुंगा, कल्याण, बदलापूर, ठाणे या रेल्वे स्थानकांमध्ये सुरक्षा बोटी तैनात केल्या आहेत. या बोटींवर प्रत्येकी ३ सुरक्षा कर्मचारी या पद्धतीने एकूण १५ विशेष कर्मचारी पथके कार्यरत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.

एनडीआरएफ सोबत मॉक ड्रिल

नुकतेच माटुंगा नागरी संरक्षण संस्थेने आणि राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल सोबत माटुंगा कॅरेज वर्कशॉपमध्ये संयुक्त मॉक ड्रिल आयोजित केले. राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) टीम आणि माटुंगा सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांचे बचाव आणि संरक्षण कसे केले जाते याविषयी सादरीकरण टीमने दाखविले. या सर्व उपक्रमादरम्यान मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक माटुंगा यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रकारच्या प्रदर्शनामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना परिचित होण्यास आणि आपत्तीच्या धोक्याच्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची हे दाखवण्यात आले.

मान्सूनपूर्व कामे मार्च महिन्याच्या अखेरीपासून सुरु होतात. आतापर्यंत जवळपास ८० टक्के कामे पूर्ण झाली असून प्रतिवर्षी उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेत मान्सून कामे करण्यात येत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शिल्लक कामे देखील पूर्ण केली जातील.

- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सुरक्षा दलाचे जवान काम जबाबदारीने करत आहेत. येणाऱ्या संकटाना रोखण्यासाठी आम्ही सज्ज असून मनुष्यबळ देखील वाढवण्यात आले आहे. रेल्वे रुळांवर ३ मीटरहून अधिक पाणी येते, तेव्हा त्या बोटी बचाव कार्यासाठी वापरण्यात येतात. एरवी पावसाळ्याच्या दिवसात गस्त घालण्याचे कार्य केले जाते.

- ऋषी शुक्ला, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in