

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महिलांच्या राखीव डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणारे प्रवासी, प्रवाशांच्या साहित्याची चोरी करणारे आणि रेल्वे मालमत्तेची चोरी करणाऱ्या ८ हजार १८४ प्रवाशांवर ऑक्टोबरमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींकडून ३८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलावर रेल्वे मालमत्ता, रेल्वे स्थानके, गाड्यांमधील आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेला गैरमार्गी घटकांपासून मुक्त ठेवण्यासाठी आरपीएफने ऑक्टोबर महिन्यात मोठी कारवाई केली आहे.
प्रवाशांच्या सामानाची चोरी आणि प्रवाशांविरुद्धच्या इतर गुन्ह्यांसाठी १६१ जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे आणि रेल्वे परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांद्वारे वंदे भारत गाड्या, राजधानी एक्सप्रेस गाड्या, मेल आणि एक्सप्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांवर लक्ष्य ठेवण्यात येते.