१४ तासांनंतर मध्य रेल्वे वाहतूक पूर्ववत

या दुर्घटनेमुळे २७ प्रवासी गाड्यांवर परिणाम झाला. त्यातील १० गाड्या रद्द केल्या, तर १७ गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या
१४ तासांनंतर मध्य रेल्वे वाहतूक पूर्ववत

मुंबई : कसारा-इगतपुरी घाट विभागात मालगाडी रविवारी घसरली होती. त्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. १४ तासांच्या अथक परिश्रमानंतर मध्य रेल्वेची ही वाहतूक पूर्ववत झाली.

रविवारी सायंकाळी ६.३१ वाजता ४५ डब्यांच्या मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरले. त्यामुळे अप व डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ही मालगाडी जेएनपीटीवरून दौलताबादकडे निघाली होती. घाटात ही रेल्वे पुन्हा रुळावर आणणे मोठे आव्हानाचे काम होते. जवळपास २४ अधिकारी ३०० कामगारांनी हे आव्हान पेलले. या दुर्घटनेत १५० मीटर रेल्वे मार्गाचे नुकसान झाले.

मालगाडी घसरण्याचे कारण सांगताना अधिकारी म्हणाले की, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून या घटनेचे कारण कळू शकेल.

दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, मुख्य इंजिनचा चालक व बँकर इंजिनच्या चालकातील विसंवाद किंवा रेल्वे रुळाला फॅक्चर झाल्याने ही घटना घडली असावी.

या दुर्घटनेमुळे २७ प्रवासी गाड्यांवर परिणाम झाला. त्यातील १० गाड्या रद्द केल्या, तर १७ गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. ही घटना घडताच विविध ठिकाणी असलेल्या कामगारांना तत्काळ घटनास्थळी बोलावण्यात आले. अपघात मदत ट्रेन ही इगतपुरीला सर्व साहित्यासह उभी होती. ती रात्री ८.३० वाजता घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर हे काम वेगाने सुरू झाले, तर दुसरी अपघात मदत ट्रेन कल्याणहून मागवली. मानवी यंत्रणेचा वापर करून चार अडकलेल्या गाड्या कार्यक्षमतेने पुढे पाठवण्यात आल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.

गाडी घसरल्याने डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच मधील मार्गावरील रेल्वे मार्गाचे नुकसान झाले.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे म्हणाले की, मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केल्याने ही वाहतूक सुरळीत झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगारांना अचूक मार्गदर्शन केले. त्यामुळे अवघ्या १४ तासांत वाहतूक सुरळीत झाली.

logo
marathi.freepressjournal.in