मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या १० फेऱ्या होणार सुरू; सोमवारपासून अंबरनाथ, बदलापूर, कर्जत परिसरातील प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर सोमवारपासून १५ डब्यांच्या गाड्यांच्या आणखी १० लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत परिसरातील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या १० फेऱ्या होणार सुरू; सोमवारपासून अंबरनाथ, बदलापूर, कर्जत परिसरातील प्रवाशांना दिलासा
मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या १० फेऱ्या होणार सुरू; सोमवारपासून अंबरनाथ, बदलापूर, कर्जत परिसरातील प्रवाशांना दिलासा
Published on

मुंबई : मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर सोमवारपासून १५ डब्यांच्या गाड्यांच्या आणखी १० लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत परिसरातील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. १२ डब्यांच्या गाड्यांचे १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये श्रेणीसुधार केल्यामुळे मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या सेवांची संख्या आता ३२ होणार आहे.

गर्दीमुळे लोकलला लटकून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे लोकलमधून पडून अपघात होत असल्याने याला पायबंद घालण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. याचाच भाग म्हणून मध्ये रेल्वेने १२ डब्यांच्या गाड्यांचे १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे.

१५ डब्यांच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत मार्गावर धावतील. यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. प्रत्येक फेरीत ३ अतिरिक्त डबे जोडल्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे.

सध्या १२ डब्यांच्या रॅकसह चालणाऱ्या काही सेवा २० जुलैपासून १५-डब्यांच्या रॅकसह चालवल्या जाणार आहेत. यामध्ये डाऊन मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अंबरनाथ ही सकाळी ९.१५, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण दुपारी १२. २६, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बदलापूर दुपारी ३.०३, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत सायंकाळी ६. २१, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अंबरनाथ (धिम्या गतीवरून जलद गतीमध्ये रूपांतरित) रात्री ११.०८ वाजता चालविण्यात येणार आहे.

उपनगरीय सेवांची एकूण संख्या १८२०

१६ ऑक्टोबर २०१२ रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर पहिल्यांदा १५ डब्यांच्या लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यात आल्या. त्यावेळी १६ लोकल सुरू करण्यात आल्या होत्या, तर ४ मार्च २०१९ पासून १५ - डब्यांच्या गाड्यांच्या आणखी ६ सेवा सुरू करण्यात आल्या. ज्यामुळे १५ डब्यांच्या सेवांची एकूण संख्या १६ वरून २२ पर्यंत वाढली. २० जुलै २०२६ पासून आणखी १० सेवांचे १२-डब्यांच्या गाड्यांवरून १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये श्रेणीसुधार केल्यामुळे, मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या सेवांची एकूण संख्या आता ३२ होईल. मात्र उपनगरीय सेवांची एकूण संख्या १८२० राहणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in