मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले ४०४ कोटी; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात वाढ

मध्य रेल्वेने शून्य भंगार स्थिती साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भंगार विक्रीतून ४०४.७२ कोटी रुपये मिळवले आहेत.
मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले ४०४ कोटी; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात वाढ
Published on

मुंबई : मध्य रेल्वेने शून्य भंगार स्थिती साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भंगार विक्रीतून ४०४.७२ कोटी रुपये मिळवले आहेत. हे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत विक्री झालेल्या रक्कमेपेक्षा अंदाजे २.८१ टक्केने वाढले आहे.

मध्य रेल्वेच्या स्टोअर्स विभागाने कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप (नाशिक), परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉप, तसेच मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये दुर्गम आणि विखुरलेल्या ठिकाणी पडलेल्या भंगार साहित्याची ओळख पटवून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे भंगार विक्री कामगिरीत उल्लेखनीय वाढ झाली आहे.

विविध श्रेणीतील भंगार आणि इतर साहित्याची विल्हेवाट लावून ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य करण्यात आली आहे. यामध्ये ४० हजार १७७ मेट्रिक टनचे कायमस्वरूपी भंगार, २ लाख ५५ हजार ३१८ स्लीपर, २५,७९० मेट्रिक टन फेरस भंगार तसेच ३ हजार ३२५ मेट्रिक टनचे नॉन-फेरस भंगार आणि ४७ लोकोमोटिव्ह, ७० कोच आणि ११० वॅगन यांचा समावेश आहे.

विभागांमध्ये, भुसावळ विभाग आघाडीवर आहे. या विभागाने ११ फेब्रुवारी रोजी ९७.७२ कोटी रुपयांची सर्वाधिक भंगार विक्री नोंदवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in