
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेने जय्यत तयारी केली आहे. चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी १६ एक्स्प्रेस तर १२ उपनगरीय लोकल सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनुयायांच्या मदतीसाठी मदत कक्ष आणि स्पेशल तिकीट बुकिंग काऊंटर तयार करण्यात येणार आहेत.
६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित देशभरातून लाखो अनुयायी दादर चैत्यभूमी येथे येतात. अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत १६ विशेष मेल/एक्स्प्रेस ट्रेन चालविणार आहे. तर ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ अतिरिक्त उपनगरीय गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुख्य मार्गावरील परळ ते कुर्ला / ठाणे आणि कल्याण दरम्यान गाड्या चालविण्यात येतील. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी/ पनवेल दरम्यान गाड्या चालविण्यात येणार आहेत.
दादर, सीएसएमटी आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ आणि जीआरपी यांच्याद्वारे २४ तास हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. तर ५ ते ७ डिसेंबर रोजी अनारक्षित तिकिटे देण्यासाठी आणि ट्रेनच्या चौकशीसाठी चैत्यभूमी येथे दोन काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. दादर, सीएसएमटी आणि कल्याण येथे अतिरिक्त यूटीएस काऊंटर सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डाॅ. स्वप्निल नीला यांनी दिली.
प्रवाशांना मार्गदर्शन
प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दादर येथे २२३, सीएसएमटी येथे १६६, एलटीटी येथे १०५, ठाणे येथे १०३ आणि कल्याण येथे ७८ असे एकूण ६७५ तिकीट तपासणी तसेच अन्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून दादर येथे २५० हून अधिक आणि सीएसएमटी येथे ८० हून अधिक जीआरपी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आरपीएफ / जीआरपी कर्मचाऱ्यांसह विशेष तिकीट तपासणी पथक / कर्मचारी आरक्षित डब्यांच्या समोरील स्थानकांवर तैनात करण्यात आले आहेत. दादर येथे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत आणि सीएसएमटी येथे फलाट क्रमांक ७ व ८ दरम्यान उपलब्ध जागेत नागरिकांना थांबण्याची व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
गर्दी व्यवस्थापन
गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी दादर येथे स्वतंत्र प्रवेश / निर्गमनाचे नियोजन केले जाणार आहे. दादर येथील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मध्य रेल्वेचा पूल आणि बीएमसी पुलावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तर दादर स्थानकाच्या प्रमुख ठिकाणी प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी ‘वे टू चैत्यभूमी’, ‘वे टू राजगृह’ इत्यादी संदर्भात २१४ बॅनर लावण्यात आले आहेत. तर सीएसएमटी, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरील चौकशी कार्यालयाजवळ ट्रेन क्रमांक आणि विशेष गाड्यांची वेळ असलेले बॅनर/स्टँडी प्रदर्शित केले जाणार आहेत. गर्दीच्या व्यवस्थापनावर देखरेख करण्यासाठी रेल्वे स्थानक आणि चैत्यभूमी परिसरात रेल्वेचे गुप्तचर अधिकारी तैनात केले जाणार आहेत. गर्दी वाढल्यास गुप्तचर अधिकारी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना देतील. यांनतर अतिरिक्त गाड्या चालविण्याचा विचार करण्यात येणार आहे.