मुहूर्त खरेदीची चैत्र पालवी! वाढती महागाई, तरी ग्राहकांची उत्साही खरेदी...

चैत्रारंभापूर्वीच महागाईचा पारा तापला असला तरी मुहूर्ताची खरेदी म्हणून ग्राहकांचे घर, वाहन, गॅझेट्स वा विद्युत उपकरणे तसेच सोने-चांदीसारख्या मैल्यवान धातूबाबतचे आकर्षण यंदाही कायम राहिले आहे.
मुहूर्त खरेदीची चैत्र पालवी! वाढती महागाई, तरी ग्राहकांची उत्साही खरेदी...
प्रातिनिधिक चायाचित्र
Published on

मुंबई : चैत्रारंभापूर्वीच महागाईचा पारा तापला असला तरी मुहूर्ताची खरेदी म्हणून ग्राहकांचे घर, वाहन, गॅझेट्स वा विद्युत उपकरणे तसेच सोने-चांदीसारख्या मैल्यवान धातूबाबतचे आकर्षण यंदाही कायम राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेत आलेली मागणी - मरगळ झटकून खरेदीच्या माध्यमातून वसंत ऋतूच्या आगमनाला ग्राहकवर्ग सज्ज झाला आहे. रेडी रेकनरच्या रूपात घर आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या रूपात वाहन येत्या महिन्यापासून -नव्या आर्थिक वर्षापासून महाग होत असताना गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणा-या सूट-सवलतीत काहिली शमविण्याची ग्राहकराजाची तयारी झाली आहे. तोळ्यासाठी नव्वदीला (१० ग्रॅम वजनाकरिता ९० हजार रुपयांहून अधिक दर) पोहोचलेल्या सोन्याची हैस ही यंदाच्या मुहूर्ताला काही ग्रॅम वा वळेतरी गाठीला बांधण्याच्या हट्टाला हा देवोभव ग्राहक आतुर आहेच.

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी साजरा होणारा गुढीपाडवा उत्साहात पार पडत आहे. या सणाच्या शुभमुहूर्तावर खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होत असलेल्या वाढत्या खरेदीमुळे विक्रेत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. यंदाचा सण उलाढालीस चालना देणारा ठरत असून लग्नादी मोसमामुळे आगामी काळातही खरेदीचा उत्साह कायम राहण्याचा आशावाद तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

वाहन खरेदी

गुढीपाडव्याला अनेकजण नवीन वाहन खरेदी करतात. कार शोरूम, दुचाकी विक्री केंद्रांवर ग्राहकांची गर्दी आहे. कंपन्यांनी विविध प्रकारच्या सूट योजना जाहीर केल्या असून फ्री इन्शुरन्स, एक्स्चेंज बोनस आणि झिरो डाऊन पेमेंटसारख्या लाभामुळे खरेदीत वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. येत्या महिन्यापासून अनेक कंपन्यांनी त्यांची वाहने महाग करण्याची घोषणा नुकतीच केली आहे.

गॅझेटसाठी ग्राहकांची विचारणा

मोबाइल, लॅपटाॅपप्रेमी ग्राहकांसाठी गुढीपाडवा हा नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, इयर इक्विपमेंट, स्मार्ट टीव्ही, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याचा उत्तम दिवस मानला जातो. ई-कॉमर्स साइट आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये विविध ऑफर, कॅशबॅक आणि सवलती उपलब्ध असल्याने ग्राहक या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. उन्हाचा हंगाम पाहता एसी, फ्रीजसाठीही ग्राहकांकडून चाचपणी होऊ लागली आहे.

दरवाढीनंतरही सोने-चांदीला पसंती

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत वेगाने वाढ होऊनही ग्राहकांचा कल अधिक असल्याचे सराफा बाजारातील चित्र आहे. पारंपरिक, नवीन डिझाईनमध्ये, सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याला पसंती दिली जात आहेत. ब्रॅण्डेड सराफ पेढ्यांनी, दालनांनी 'मेकिंग चार्जेस'वर ४० टक्क्यांपर्यंतची सवलत दिल्याने ग्राहकांचा प्रतिसाद अधिक वाढला आहे. सोने वर्षभरात तोळ्यामागे २० हजार रुपयांनी वाढले आहे.

घर खरेदी

गुढीपाडव्याला गृह खरेदीसाठी अनेक विकासकांनी या निमित्ताने आकर्षक सवलती, योजना जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे बँकांचे कर्ज व्याजदर किमान पातळीवर असल्याने मागील काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या गृह खरेदीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाढ अपेक्षित असून नवीन फ्लॅट आणि प्लॉटसाठी नोंदणी वाढत आहे. येत्या महिन्यापासून वाढणाऱ्या रेडी रेकनर दरांपूर्वी संधी साधण्याची गृह खरेदीदारांची घाई दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in