Chaityabhoomi Dadar: महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांनी पाण्यासह अल्पोपाहाराची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सकाळ व संध्याकाळचा नाष्टा तसेच जेवणाची मोफत व्यवस्था देखील केली आहे
Chaityabhoomi Dadar:  महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्याने देशभरातील भीम अनुयायी दादरमध्ये दाखल झाले आहेत. रेल्वे स्थानकातून ते चैत्‍यभूमीपर्यंतचे सगळे रस्‍ते गर्दीने भरून गेले आहेत. अनेक अनुयायांनी चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेण्यासोबतच आंबेडकरी साहित्य खरेदीवर भर दिला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लखोंच्या संख्येने अनुयायी दादरमध्ये दाखल झाले होते. मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे त्‍यांच्या राहण्याची व्यवस्था केली असून अनेक कुटुंबे येथे विसावली आहेत. विशेष म्‍हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसत आहे. काही अनुयायांनी दर्शनासाठी लागणारी रांग आणि उसळणारी गर्दी लक्षात घेऊन आजच चैत्यभूमीला जाऊन अभिवादन केलं आहे.

महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांनी पाण्यासह अल्पोपाहाराची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सकाळ व संध्याकाळचा नाष्टा तसेच जेवणाची मोफत व्यवस्था देखील केली आहे. काही संघटनांनी आरोग्य तपासणी शिबिरे सुरू केली आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्रचिकित्सा केली जात आहे.

अनेक अनुयायी पुस्तकांच्या दुकानांवर गर्दी करत असल्‍याचे दिसून आले आहे. भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुस्तकांबरोबरच संविधानाला अधिक मागणी आहे. बेस्ट प्रशासनाकडून विविध सुविधांसह मोफत पुस्तकवाटप केले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in