महेश सावंत यांच्या आमदारकीला आव्हान; सदा सरवणकर यांची हायकोर्टात धाव

आमदार महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका सरवणकरांनी दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
महेश सावंत यांच्या आमदारकीला आव्हान; सदा सरवणकर यांची हायकोर्टात धाव
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता याच मतदारसंघातून विजयी झालेले ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदार महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका सरवणकरांनी दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

महेश सावंत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रावर चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप सदा सरवणकरांनी याचिकेतून केला आहे. गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दाखवणे आवश्यक आहे.

मात्र, जनतेची दिशाभूल करुन स्वत:वरील चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. मतदारसंघात महेश सावंत, सरवणकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यात मुकाबला रंगला होता. त्यात महेश सावंत यांना ५०,२१३ तर सरवणकर यांना ४८,८९७ आणि अमित ठाकरे यांना ३३,०६२ मते मिळाली होती. सरवणकर यांचा फक्त १,३१६ मतांनी पराभव झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in