गेले काही दिवस भाजप नेत्या आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच, 'दिसेल तिथे थोबाड फोडले जाईल' अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला इशारा दिला होता. यावरून आता अॅड. नितीन सातपुते यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली असून ते म्हणाले की, चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे उर्फी जावेदचे मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे. यावरून आता महिला अयोग्य काय भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
धमकी दिल्याप्रकरणी महिला आयोगाने दखल घेऊन चित्रा वाघ यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी अॅड. नितीन सातपुते यांनी केली आहे. ते तक्रारीमध्ये म्हणाले आहेत की, "उर्फी जावेदच्या फॅशनवरुन चित्रा वाघ लोकांना गुन्हा करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यांचे समर्थक उर्फी जावेदला ट्रोल करत आहेत. उर्फीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नदेखील करत आहेत. त्यामुळे उर्फी जावेदच्या जीवाला चित्रा वाघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उर्फी जावेदचे मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे. त्या सातत्याने उर्फीला सोशल मीडिया आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्रास देत आहेत. तरीही वाघ यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे महिला आयोगाने या प्रकरणात सुमोटो दाखल करावा."