
मुंबई : ‘पिक अवर’ची गर्दी टाळण्यासाठी आता मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल. मध्य रेल्वेच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर कार्यालयातील दोन हजार कर्मचाऱ्यांचे नवीन वेळापत्रकानुसार ड्युटीचे शेड्युल असणार आहे. बुधवार १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर रजनीश गोयल यांनी दिली. दरम्यान, मध्य रेल्वेने अंमलबजावणी केली असून बीएमसी, रुग्णालय, बँक, शाळा आदींनीही कर्मचाऱ्यांचे ड्युटी शेड्युल बदलावे, यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले.
मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यात मध्य व हार्बर मार्गावर ५० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत मध्य रेल्वे मार्गांवरील प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर ताण येतो. मध्य रेल्वे मार्गावर येणारा ताण कमी करण्यासाठी ‘पिक अवर’मध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयात एकूण ३१ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांच्या कार्यालयात दोन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या डीआरएम कार्यालयात दोन हजार कर्मचाऱ्यांची वेळ बदलण्यात आली असून बुधवार १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१ नोव्हेंबरपासून लागू !
दरम्यान, सकाळी ९.३० ते ५.४५ पहिली ड्युटी तर सकाळी ११.३० ते ७.४५ या दरम्यान दुसरी ड्युटी राहील. १ नोव्हेंबरपासून हे बदल लागू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून जे रोस्टर लागेल, तेच त्या कर्मचाऱ्याला लागू राहणार आहे.