

मुंबई : ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसांत, शहरांमध्ये सात दिवसांत आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पहावी लागणार नाही. महावितरणची ही व्यवस्था गुरुवार, १ जानेवारीपासून सुरू झाली आहे.
महावितरणकडून मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात वीजपुरवठा सेवा दिली जाते. ग्राहकांना नव्या वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जाची तपासणी झाल्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना दिली जाते.
पायाभूत सुविधांसह ९० दिवसांत जोडणी
नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महानगरांसाठी तीन दिवस, शहरांसाठी सात दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत कनेक्शन देण्याची तरतूद केली असली तरी ती जेथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, त्यासाठी ही कालमर्यादा आहे. विजेचे खांब उभारून व तारा जोडून वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी ९० दिवस लागणार आहेत.