स्वस्त गारेगार प्रवास तरी फुकट्या प्रवाशांची ‘बेस्ट सैर’

२० हजारांहून अधिक फुकट्यांवर कारवाई ५ महिन्यात १३ लाखांचा दंड वसूल
स्वस्त गारेगार प्रवास तरी फुकट्या प्रवाशांची ‘बेस्ट सैर’

मुंबई : विना तिकीट अथवा अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांविरोधात बेस्ट परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारला जातो. जानेवारी ते मे २०२३ या ५ महिन्यात २० हजार ९८६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १३ लाख ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सुरक्षित, स्वस्त व गारेगार प्रवास तरीही बेस्ट बसने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची बेस्ट सैर सुरुच आहे.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा, यासाठी वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. पहिल्या पाच किलोमीटरसाठी साध्या बससाठी ५ रुपये व वातानुकूलित बसेससाठी ६ रुपये तिकीट आकारले जाते. सर्वात स्वस्त आरामदायी व गारेगार प्रवासाची सुविधा उपलब्ध असताना अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची ‘बेस्ट सैर’ सुरूच आहे.

बेस्ट बसगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध तसेच खरेदी केलेल्या तिकीटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध उघडण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जानेवारी ते मे २०२३ या ५ महिन्याच्या कालावधीत एकूण २०, ९८६ प्रवासी विना तिकीट आढळले असून त्यांच्याकडून १३ लाख ४ हजार एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

विना तिकीट प्रवास टाळा!

स्वस्त, सुरक्षित, आरामदायी व गारेगार प्रवास म्हणून प्रवासी बेस्ट बसला पसंती देतात. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या बेस्ट साध्या बसचे तिकीट किमान ५ रुपये व वातानुकूलित बसचे ६ रुपये तिकीट असल्याने प्रवाशांना स्वस्त तिकिटात आरामदायी प्रवास करता येतो. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणे कायदेशीर गुन्हा आहे. प्रवाशांनी तिकिट काढून आरामदायी प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क विभागाकडून करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in