
मुंबई : सुमारे ७५ लाख रुपयांच्या हिऱ्यांचा अपहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महेश कमरशी वसोया या सुरतच्या व्यापाऱ्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. महेशने वसई आणि दुबईतील काही व्यापाऱ्यांची अशाच प्रकारे २ कोटी ५३ लाखांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. २१ वर्षांचा आर्यन उमीत रुपरेल हा हिरे व्यापारी असून, तो त्याच्या आई-वडिलांसोबत अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून, वांद्रे येथील वॉटर फिल्टर रोडवर त्यांचे अबॅक्स जेम्स ज्वेलरी नावाचे एक दुकान आहे.
गेल्या एक वर्षांपासून त्याचे वडिल उमीत रुपरेल हे लंडन आणि दुबईतील शोरुमचे काम पाहत असून, तो स्वत वांद्रे येथील दुकानाचे काम पाहत होता. गुजरातच्या राजकोटचा रहिवाशी असलेला महेश वसोया हा त्याच्या वडिलांचा व्यापारी मित्र असून, त्यांची त्यांच्याशी दुबईत ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात दुबईत चार वेळा हिऱ्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता.