रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक

चौकशीत संतोषने त्यांच्या गावातील अनेक तरुणांना रेल्वे नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकाळल्याचे उघडकीस आले
रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक

मुंबई : रेल्वेत टीसी पदासाठी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन भामट्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. संतोष बाबू राणे आणि कैलास उमाजी अवघडे अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अनेकांना रेल्वेचे नोकरीचे नियुक्तीपत्रासह ओळखपत्र दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अनिल शंकर पिंपळकर हे मूळचे रत्नागिरीच्या दापोलीचे असून त्यांच्याच गावचा संतोष राणे याने त्यांच्या मुलांना रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखविले होते. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. नोकरीसाठी त्याने त्यांच्याकडून जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत चार लाख रुपये घेतले होते. मार्च महिन्यांत त्याने त्यांच्या मुलीला टीसी म्हणून नोकरी लागल्याचे एक पत्र दिले होते. या पत्रात रेल्वेच्या सेंट्रल व महाप्रबंधक अधिकारी पद अधिकारी, रेल्वे मंडळ भवन यांचे स्वाक्षरी होती. मात्र चार महिने उलटूनही त्याने पोस्टिंग दिली नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची चौकशी सुरू केली होती.

या चौकशीत संतोषने त्यांच्या गावातील अनेक तरुणांना रेल्वे नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकाळल्याचे उघडकीस आले. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संतोष राणे आणि कैलास अवघडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी रेल्वेचे बोगस दस्तावेज बनवून नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in