प्रशांत दामलेंच्या पत्नीची फसवणूक; मोबाइलवर आलेली लिंक ओपन करणे पडले महागात

प्रशांत दामलेंच्या पत्नीची फसवणूक; मोबाइलवर आलेली लिंक ओपन करणे पडले महागात

प्रशांत दामले हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत अंधेरीतील सात बंगला परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहतात.

ऑनलाइन ऑर्डरचे पैसे पाठविण्यासाठी मोबाइल लिंक पाठवून अज्ञात सायबर ठगाने अभिनेते प्रशांत दामले यांच्या पत्नीची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अभिनेता प्रशांत दामले यांची पत्नी गौरी दामले यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी या ठगाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांत वर्सोवा पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

प्रशांत दामले हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत अंधेरीतील सात बंगला परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीने ऑनलाइन कॅश ऑन डिलिव्हरी या स्वरूपात कपड्यांची ऑर्डर केली होती. ऑर्डर केल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी पाच दिवसांनी पार्सल आले होते. पार्सल घेऊन त्यांच्या मुलीने ११०० रुपयांचे पेमेंट केले होते; मात्र पार्सल उघडून पाहिल्यानंतर त्यांनी ऑर्डर केलेले कपडे नव्हते. दुसरेच कपडे असल्याने गौरी दामले यांनी ऑनलाइन कंपनीचा मोबाइल क्रमांक शोधून काढला. यावेळी तिला एक मोबाइल क्रमांक सापडला. तिथे संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तीने कॉल घेतला नाही. त्यानंतर तिला काही वेळानंतर दुसऱ्‍याच मोबाइलवरून एका व्यक्तीने फोन करून तिची तक्रार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिने तिच्या पैशांची मागणी केल्यांनतर त्याने पैसे बँक खात्यात जमा होत नसून कॅश स्वरूपात देता येत नाही; मात्र तिने बँक डिटेल्स देण्यास नकार दिला. त्यानंतर या व्यक्तीने तिच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून लिंकमध्ये तिच्या माहितीसह बँक डिटेल्स भरून पाठविण्यास सांगितले. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे फॉर्म होते, त्यामुळे तिने फॉर्म भरण्यास नकार दिला. त्यानंतर तिने तो मोबाइल क्रमांक ब्लॉक केला होता. रविवार, २ ऑक्टोबरला तिच्या मोबाइलवर नऊ ऑनलाइन व्यवहार झाल्याचे दिसून आले. या व्यवहारातून तिच्या बँक खात्यातून सुमारे ८९ हजार रुपये ट्रान्सफर झाले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिचा बँक खाते ब्लॉक केले होते. त्यानंतर तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा वर्सोवा पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करीत आहेत. 

logo
marathi.freepressjournal.in