

मुंबई : चेंबूर झाड दुर्घटनेचा अहवाल मान्य नसल्याचे सांगत पुन्हा चौकशी करण्याचे आदेश महापौर रितू तावडे यांनी १६ जुलै रोजी सभागृहात दिले. मात्र आज १२ दिवस उलटले तरी करण्याची तसदी पालिका चौकशीसाठी समिती स्थापन प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे महापौरांच्या आदेशानंतरही पालिका प्रशासन उदासीन असल्याची माहिती समोर आली असून याबाबतची चौकशी पुन्हा कागदावरच आहे. चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळून ११ वर्षीय विहानचा करुण अंत झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने सादर केलेल्या अहवालात कंत्राटदार व सल्लागार यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र पालिकेच्या रस्ते विभाग व उद्यान विभागातील कोणाही अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्यात आलेली नाही.
पहिल्या अहवालावर महापौर रितू तावडे यांचा आक्षेप
मुंबई महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अहवालावर महापौर रितू तावडे यांनी आधीच आक्षेप घेतला आहे. त्यानंतर गुरुवार १६ जुलै रोजी झालेल्या सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी अहवालावर नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते गणेश खणकर यांनी अहवाल मान्य नसल्याचे सांगत अहवाल फाडला होता. तसेच तृतीय पक्षामार्फत चौकशी (थर्ड पार्टी ऑडिट) करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अभियंत्यांकडून दिशाभूल करण्यात आली...
अपघातानंतर आपण स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती, असे सांगत महापौर म्हणाल्या, 'रस्ते काँक्रीटीकरणाचे काम चांगले व्हावे आणि खड्डे पडू नयेत म्हणून आम्ही पाहणी केली. त्यावेळी झाडांचे संरक्षण केले जाईल, अशी खात्री अभियंत्यांनी दिली होती. मात्र आमची दिशाभूल करण्यात आले', असे महापौर रितू तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
महापौरांच्या आदेशालाच केराची टोपली!
'समितीने झाड पडण्यामागे एकच कारण असल्याचा निष्कर्ष काढलेला नाही. सुमारे ६० ते ७० वर्षे जुने हे झाड आतून पूर्णपणे पोकळ झाले होते. अशा झाडांचे नेमके कधी कोसळेल, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अचूक अंदाज बांधणे अत्यंत कठीण असते,' असे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र अहवाल मान्य नसल्याचे ठणकावत पुन्हा चौकशी करुन अहवाल सादर करा, असे आदेश महापौर रितू तावडे यांनी १६ जुलै रोजी सभागृहात पालिका प्रशासनाला दिले. मात्र आज १२ दिवस उलटले तरी चौकशी समिती स्थापन करण्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असून महापौरांच्या आदेशालाच केराची टोपली प्रशासनाने दाखवली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रशासन गंभीर नाही : समृद्धी काते
चेंबूर येथे स्कूल व्हॅन वर पिंपळाचे झाड कोसळले आणि ११ वर्षीय विहानचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेचा अहवाल पालिका प्रशासनाने सादर केला, मात्र कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सभागृह नेते गणेश खणकर यांनी सभागृहात पालिका प्रशासनाने सादर केलेला अहवाल फाडत निषेध केला. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पुन्हा चौकशी करण्याचे आदेश १६ जुलै रोजी सभागृहात दिले. मात्र आजतागायत प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली नाही. चेंबूर दुर्घटना प्रकरणी प्रशासन गंभीर नाही.