चेंबूरला नऊ जण होरपळले, गॅस गळतीमुळे आग; तिघे चिंताजनक

चेंबूर पूर्व जैन मंदिरासमोरील सिद्धार्थ कॉलनीत गुरुवारी रात्री ११.४५ वाजता भीषण आग लागली.
चेंबूरला नऊ जण होरपळले, गॅस गळतीमुळे आग; तिघे चिंताजनक

मुंबई : चेंबूर पूर्व जैन मंदिरासमोरील सिद्धार्थ कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून, यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

चेंबूर पूर्व जैन मंदिरासमोरील सिद्धार्थ कॉलनीत गुरुवारी रात्री ११.४५ वाजता भीषण आग लागली. कॉलनीतील एका घरात गॅस लिकेजमुळे अग्निभडका उडाला. मध्यरात्रीची वेळ असल्याने कॉलनीतील रहिवासी गाढ झोपेत होते. काही वेळातच आग वाऱ्यासारखी पसरली आणि कॉलनीतील रहिवाशांची धावपळ उडाली. कॉलनी परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवत बचावकार्य सुरू केले; मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होण्याआधीच गायकवाड कुटुंबातील ६ जणांसह एकूण ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी, गोवंडी शताब्दी, सायन रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यशोदा गायकवाड (५६) ६० टक्के भाजले, नर्मदा गायकवाड (६०) ५० टक्के भाजले, रमेश गायकवाड (५६) ६० टक्के भाजले असून, तिघांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जितेंद्र कांबळे (४६) ४० ते ५० टक्के भाजले, संगीता गायकवाड (५५) २० ते ३० टक्के भाजले असून, यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात, तर श्रेयस सोनकांबळे (१७) किरकोळ जखमी, श्रेया गायकवाड (४९) ४० टक्के भाजले, यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृषभ गायकवाड (२३) ३० टक्के भाजले, संदीप जाधव (४२) किरकोळ जखमी असून, या दोघा जखमींपैकी वृषभ गायकवाड मानक रुग्णालय, तर संदीप जाधव यांना गोवंडी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in