

मुंबई : चेंबूरच्या मरवली चर्च परिसरातील सिंद कॉस्मोपॉलिटी खासगी शाळा गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून बंद असल्याने सुमारे ६०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना माहुल परिसरातील शाळेत हलविण्याचा पर्याय पुढे आला असला, तरी माहुलमध्ये जाण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने पर्यायी वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिक्षण निरीक्षकांकडून मुंबई महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
मरवली चर्च परिसरात सिंद कॉस्मोपॉलिटी ही खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेची इमारत धोकादायक स्थितीमध्ये आहे. शाळेसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने धोकादायक शाळेत मुलांना शिक्षण देण्यात येत होते. शाळेचे वर्ग सुरू असतानाच या शाळेत छताचा स्लॅब पडत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी पालकांकडे केल्या होत्या. त्यानुसार काही पालकांनी शाळेत जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास विरोध केला. यामुळे शाळा व्यवस्थापनाने आठ ते पंधरा दिवसात पर्यायी व्यवस्थ्या होईपर्यंत विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे आजही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून आहेत. शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणात खंड पडत असल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शाळेने दिलेल्या आश्वासनानंतर महिना उलटला तरी देखील पर्यायी जाग मिळाली नसल्याने संतप्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बुधवारी मरवली चर्च येथील आरसी मार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना माहुल येथे वर्ग स्थलांतरित करून शिक्षण देण्याचा पर्याय सुचविण्यात आला. त्याप्रमाणे पालकांनी माहुल येथील वर्ग खोल्याची पाहणी केली. मात्र प्रवास, परिसर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह विविध कारणांमुळे पालकांनी माहुलमध्ये शाळा भरविण्यास नकार दिला आहे.
महिनाभरात शाळा पर्यायी ठिकाणी सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु दोन महिने झाले तरी असून शाळा सुरू झालेली नाही. आम्ही जॉब करत असल्याने विद्यार्थ्यांना फोन कसा उपलब्ध करून देणार, असा प्रश्न आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाऐवजी ऑफलाइन शिक्षण सुरु झाले पाहिजे. शाळेने शाळा धोकादायक आहे, हे सांगितले नाही.
भारती धोत्रे, पालक
माझी मुलगी नववीमध्ये आहे. तर माझ्या बहिणीचा मुलगा आठवीमध्ये आहे. ऑनलाईनमध्ये मुलांचे व्यवस्थित शिक्षण होत नाही. शाळा सुरू व्हावी यासाठी आम्ही वारंवार आंदोलन करत आहोत. सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मुले ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. या ऑनलाईन शिक्षणामुळे आमच्या मुलांचे डोळे खराब होऊ लागले आहेत.
हिना अन्सारी, पालक