

मुंबई : चेंबूर येथील दुर्घटनेतील चौकशी अहवाल समोर आला असून उद्यान विभाग आणि रस्ते विभागाला क्लिनचिट दिली आहे. मात्र झाडाजवळ सुरू असलेल्या कामादरम्यान योग्य ती खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवत रस्ते विभागाचा कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांच्यावर ५ लाख रुपये, तर कामावर देखरेख ठेवणारे मे. माहिमतुरा कन्सल्टंट यांच्यावर २ लाख रुपये दंडाची शिफारस चौकशी समितीने केली आहे.
दरम्यान, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावेळी झाडांच्या बुंध्याभोवती ३ मीटर बाय ३ मीटरचा पाण्याचा व हवेचा प्रवेश राहील असा मोकळा भाग ठेवणे, अशा महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. मात्र चेंबूर येथे झाड कोसळण्याचे कारण अस्पष्टच आहे.
चेंबूर दुर्घटनेतील अहवाल महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आला असून, त्यातील निष्कर्ष व शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार, दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने संबंधित झाडाची आवश्यक छाटणी केली होती तसेच पर्जन्य जलवाहिनीच्या कामामुळे झाडाच्या सुरक्षिततेबाबत रस्ते विभागाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या.
या उपाययोजनांवर भर
झाडांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित मानक कार्यप्रणाली तयार करणे, प्रत्येक प्रकल्पासाठी वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती करणे, झाडांचे नियमित ट्री रिस्क असेसमेंट, जीआयएस आधारित नोंदणी, झाडांच्या मुळांचे वैज्ञानिक संरक्षण, अतिरिक्त काँक्रीटीकरण टाळणे, अशी सूचना समितीने केली आहे.