मुंबईत ८२ ठिकाणी होणार छटपूजा उत्सव छटपूजेसाठी पालिकेकडून सोयीसुविधा

येत्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या छटपूजेसाठी आयोजकांनी तयारी सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छटपूजा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे
मुंबईत ८२ ठिकाणी होणार छटपूजा उत्सव छटपूजेसाठी पालिकेकडून सोयीसुविधा

मुंबई : मुंबईत पहिल्यांदाच नवरात्रोत्सवानंतर आता छटपूजा उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासनाकडून केले जाणार आहे. गणेशोस्तवाच्या धर्तीवर ही व्यवस्था केली जाणार आहे. छटपूजेसाठी मुंबईत सुमारे ८२ छटपूजा स्थळांवर भाविकांसाठी आवश्यक त्या नागरी सेवासुविधा पुरविण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. या निर्देशानंतर पालिका प्रशासनाने सुविधा उपलब्ध करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

येत्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या छटपूजेसाठी आयोजकांनी तयारी सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छटपूजा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. मुंबईतील सुमारे ८२ छटपूजा स्थळांवर हा उत्सव होणार आहे. या उत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यंदा पहिल्यांदाच या उत्सवासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. उत्सवासाठी लागणाऱ्या सेवासुविधा पुरवण्यासाठी पालिकाही तयारीला लागली आहे. भाविकांसाठी आवश्यक त्या नागरी सेवासुविधा पुरविण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. त्यानुसार, महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभाग कार्यालयांनी योग्य ती कामे हाती घेतली आहेत, अशी माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

दरम्यान, येत्या शनिवारी होणाऱ्या छटपूजा उत्सवाआधी दोन दिवस उत्सवाठिकाणच्या स्वच्छतेसाठी साफसफाईचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर उत्सवाच्या दिवशी पाणी, विद्युत व प्रकाशव्यवस्था, धूम्रफवारणी आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

अशी असणार व्यवस्था -

- छटपूजेच्या एकूण ८२ ठिकाणी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

- विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये आवश्यक असेल त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करणार

- आवश्यक ठिकाणी आरोग्य सुविधा, रुग्णवाहिकेची सोय

- आरती व पूजेसाठी टेबलची व्यवस्था

- शौचालयांची सोय

- निर्माल्य कलश, निर्माल्य वाहन याची व्यवस्था करण्यात यावी

- महिला भाविकांसाठी चन्जिंग रुमची व्यवस्था

- पिण्याच्या पाण्याची, वीज, प्रकाश व्यवस्था

- छटपूजास्थळी साफ सफाई

logo
marathi.freepressjournal.in