
छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू येथील समाधी स्मारकाच्या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आली नाही,” असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “आघाडी सरकारकडे समर्थन नव्हते, तेव्हा ४०० शासन आदेश काढून जेवढे पैसे नव्हते, त्याच्या पाचपट पैसे वाटले,” असा आरोपही त्यांनी केला.विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, शिंदे-फडणवीस सरकारने आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देतानाच छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या कामांनाही स्थगिती दिल्याचा आरोप केला होता. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला. संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या कामांना आपण कोणतीही स्थगिती दिलेली नाही, तर योजनेत जी कामे हाती घेण्यात आली आहेत, त्या कामांचे सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करावे, असे आपण संबंधित नस्तीवर लिहिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. समाधीस्थळात काही कामे राहिली असतील, तर त्याचाही समावेश करण्याच्या सूचना आपण केल्याचेही त्यांनी सांगितले.माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “सरकारने व्यक्ती पाहून किंवा एकट्या पर्यटन विभागाचा आढावा घेतलेला नाही, तर आघाडी सरकारने समर्थन नसताना ४०० शासन आदेश जारी केले. पाचपट पैसे वाटप करताना बजेटचा विचार केला नाही. हे असे चालू दिले तर सरकारला बट्टा लागेल.