
राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला, अशी टीका करत छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही, असे शुक्रवारी स्पष्ट केले. शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि संजय पवार या दोन उमेदवारांचे अर्ज गुरुवारी भरल्यानंतर राज्यसभेच्या उमेदवारीवरून छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. “राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी मी निवडणूक लढणार नाही. जनता हीच माझी खरी ताकद आहे. यापुढे स्वराज्य संघटनेला मी अधिक बळकट करणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आणि विस्थापित मावळा संघटित करणार,” असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
“राज्यसभेच्या उमेदवारीबाबत मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये माझी मुख्यमंत्र्यांसोबत पहिली बैठक झाली होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रवेशाची अट घातल्यानंतर तेव्हाच मी स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्या बैठकीतही महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी मला देण्याबाबत ड्राफ्ट करण्यात आला आणि हाच ड्राफ्ट फायनल असल्याचे तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी मला सांगितले होते. मात्र, या बैठकीनंतर मी कोल्हापूरला रवाना होताच कोल्हापुरातील माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त माध्यमांवर झळकले. त्यानंतर मी सेनेच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला,” असे संभाजीराजे म्हणाले.