
मुंबई : न्यायाधीश बनणे ही दहा ते पाच नोकरी नाही. ही समाजाची व देशाची सेवा करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश बी.आर.गवई यांनी शनिवारी केले.
बॉम्बे हायकोर्टात आयोजित केलेल्या समारंभात ते म्हणाले की, न्यायपालिकेचे पावित्र्य कायम राहील, याचे भान न्यायाधीशांनी ठेवले पाहिजे. कारण वकील-न्यायाधीशांच्या निष्ठा व समर्पणातून न्यायपालिकेची प्रतिष्ठा वाढली आहे. आपला विवेक, पदाची शपथ व कायद्यानुरूप काम करावे, अशी अपेक्षा न्यायाधीशांकडून ठेवली जाते. खटल्याचा निकाल लागल्यावर त्याने विचलीत होता कामा नये. न्यायाधीशांनी आपल्या शपथेबाबत प्रामाणिक राहिले पाहिजे, असे गवई म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कायदा किंवा राज्यघटनेची व्याख्या व्यावहारिक असावी. ती समाजाची गरज व विद्यमान पिढीच्या अडचणी समजुन घेणारी असावी, असे त्यांनी सांगितले.