मुख्यमंत्र्यांची मनसेवर टीका : ‘डॉ. इकबालसिंह चहल कोविड वॉरियर’ पुस्तकाचे प्रकाशन
दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट ओढवले, त्यावेळी फक्त अन् फक्त रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज ऐकू येत होता. मात्र, आता नको त्या भोंग्यांचा आवाज ऐकू येतो, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसेवर केली. मे २०२० पासून कोरोना विरोधात लढा देणारे पालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल कोविड वॉरियर या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर कोरोनाच्या तीन लाटा मुंबईत धडकल्या. तर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननेही मुंबईत धडक दिली होती; मात्र त्यावेळेपासून आयुक्तांनी ग्राऊंड झीरोवर उतरुन काम केले आणि तिन्ही लाटा परतवण्यात पालिकेला यश आले. या लढ्यात राज्य सरकार असो वा मुंबई महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी, सफाई कर्मचारी प्रत्येकाने कोरोनाला हरवण्यासाठी रात्रंदिवस लढा दिला आहे. मुंबईकरांनीही नियमांचे पालन केल्याने कोरोनावर मात करणे शक्य झाले. कोरोना संकटात रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या रुग्णवाहिकांचाचं आवाज ऐकू येत होता. मात्र आता नको त्या भोंग्यांचा आवाज कानी पडत आहे, असा टोला मनसेला लगावला. कोविड काळात आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाने जीवाची बाजी लावत कोरोनाला मुंबईतून हद्दपार केले. कोरोनाला हरवण्यासाठी मुंबई मॉडेल राबवण्यात आले, त्याचे जगभरातून कौतुक करण्यात आले.
यावेळी लेखक मिनाझ मर्चंट, ‘महारेरा’ चे अध्यक्ष अजोय मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. संजीव कुमार, पी. वेलारासू आदी उपस्थित होते.
‘मुंबई मॉडेल’ या पुस्तकात शब्दबद्ध!
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेमुळे ३५ लाख कुटुंबांपर्यंत महानगरपालिका पोहोचली. रुग्णाला थेट कोविड अहवाल न देता प्रभाग कार्यालयाच्या माध्यमातून हा अहवाल देणारे मुंबई हे जगातील एकमेव शहर असून सुमारे पावणेअकरा लाख कोविड अहवाल दिले. धारावी पॅटर्न, रुग्णवाहिका, १४४ खासगी रुग्णालयांना महापालिकेच्या डॅशबोर्डवर आणणे, ऑक्सिजन सुविधा, लसीकरणावर भर आदी स्वरुपाची असंख्य कामे या काळात झाली. 'मुंबई मॉडेल' ची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे, असे पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी यावेळी सांगितले.
२९ मॉडेल्स राबवली - आयुक्त
आयुक्त म्हणून जबाबदारी दिली, त्यावेळी मुख्यमंत्री एकच म्हणाले यश तुमचे अपयश माझे आणि माझ्यावर कोरोना संकटात मुंबईची जबाबदारी दिली. कोरोना काळात प्रत्येक रुग्णाला उपचार मिळावे यासाठी कोविड सेंटर सुरु करण्याची कल्पना मुख्यमंत्र्यांचीचं होती. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजनाही राबवण्याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच होती. कोरोनावर वेळीच मात करण्यासाठी मुंबईत २९ मॉडेल राबवण्यात आल्याचे आयुक्त डॉ. इकाबल सिंह चहल यावेळी म्हणाले.