

मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने चिरागनगर येथे उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी) तसेच स्मारक हे तमाम वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्ष व स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक ठरेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. स्मारकाचे काम जुलै २०२९ पर्यंत पूर्ण करून त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा मानसही फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवला.
घाटकोपरच्या चिरागनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि मुंबई महापालिका यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या 'लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था' तसेच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदचे उपसभापती सचिन अहिर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू तावडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, २०१६ मध्ये या स्मारकाचा निर्णय घेण्यात आला होता. खासगी विकासकांऐवजी एसआरएकडून प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे काम अधिक पारदर्शक आणि गतीने पूर्ण होईल. स्मारक उभारताना परिसरातील प्रत्येक पात्र आणि अपात्र रहिवाशालाही योग्य घर देऊनच पुनर्वसन करण्यात येत असून, कोणालाही बेघर करून विकास केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव करताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या साहित्याचे २७ हून अधिक भाषांमध्ये भाषांतर झाले असून रशियन, फ्रेंच आणि इटालियनसारख्या भाषांमधून त्यांचे विचार जगभर पोहोचले आहेत.
स्मारकाचे काम रखडणार नाही
स्मारकाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश एसआरए आणि संबंधित यंत्रणांना देत मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडू दिला जाणार नाही. सामाजिक समता, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश देणारे हे स्मारक महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरेल. तसेच पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून त्याचेही लवकर लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्मारकाची प्रमुख वैशिष्ट्ये :
२० मीटर उंच कांस्य पुतळा आणि प्रोजेक्शन मॅपिंग (लेझर शो)
अण्णाभाऊंच्या चिरागनगरमधील मूळ घराचे जतन
डिजिटल अनुभव दालन, व्हर्च्युअल टूर, मेणाचा पुतळा आणि बहुभाषिक ऑडिओ सुविधा
'वॉक विथ अण्णाभाऊ' संकल्पनेतून वाटेगाव ते मुंबई २५५ किमी पदयात्रेचे विशेष दालन
ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य केंद्र आणि अभ्यासिका, ॲम्फिथिएटर
हरित छत आणि १५० वाहनांसाठी पार्किंग सुविधा
अण्णाभाऊंच्या मूळ गावातही स्मारक : एकनाथ शिंदे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. बाधित कुटुंबांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन केले जात असून, अण्णाभाऊंच्या मूळ गावी वाटेगाव येथे ५० कोटी रुपयांचे स्वतंत्र स्मारकही उभारले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.