द्रौपदी मुर्मू यांना निवडणुकीत २०० मते मिळवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

आमदारांपाठोपाठ खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शिवसेनेने रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला
 द्रौपदी मुर्मू यांना निवडणुकीत २०० मते मिळवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

भाजपप्रणित रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत २०० मते मिळवू, असा दावा केला आहे. एकूण संख्याबळ पाहता २०० मतांची बेगमी करण्यासाठी शिंदे यांना काँग्रेस किंवा राष्‍ट्रवादीची मते फोडावी लागणार हे उघड आहे. २१ जुलै रोजी मतमोजणी होणार असून द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानण्यात येत आहे.

राज्‍यात सत्‍तांतर झाल्‍यानंतर राजकीय चित्र पालटले आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शिवसेनेने रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत २०० मतांची बेगमी केल्‍याचा दावा केला आहे. विधानसभेत सध्या २८७ आमदार आहेत. यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे १६४ आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेनेनेही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला असल्‍याने ठाकरे गटाचे १५ आमदारही त्‍यांना मतदान करणार आहेत. त्‍यामुळे मुर्मू यांना १७९ आमदार मतदान करतील. उर्वरित तब्‍बल २० आमदार कुठून आणणार हा प्रश्न आहे. त्‍यासाठी काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्याच आमदारांची मते शिंदे यांना मिळवावी लागणार आहेत.

दरम्‍यान, राष्ट्रपती निवडणूक २०२२च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी रविवारी विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्राँग रूमलाही भेट दिली. त्याचबरोबर विधानभवनात झालेल्या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी निवडणूक तयारीची माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in